धनादेश न वटल्याप्रकरणी एकास १ वर्षाची शिक्षा आदर्श पतसंस्थेकडून घेतले होते २० लाखांचे कर्ज

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) : चिंचोली लिंबाजी येथील आदर्श नागरी पतसंस्थेकडून २० लाख रुपये कर्ज घेऊन परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्यामुळे आरोपीस १ वर्ष शिक्षा व पतसंस्थेस २५ लाख रुपये देण्याचे आदेश फुलंब्री न्यायालयाने दिले.

नानासाहेब पुंडलिक मनगटे यांनी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा चिंचोली लिंबाजी यांच्याकडून २० लाख रुपये कर्ज घेतले. कर्ज रकमेची परतफेड न करता परतफेडीसाठी दिलेला २२ लाख ७९ हजार १३९ रुपयांचा धनादेश दिला. धनोदश न वटल्यामुळे आरोपीस दंड म्हणून १ वर्षाची शिक्षा व आदर्श पतसंस्थेस २५ लाख रुपये देण्याचे आदेश फुलंब्री येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. आर. एस. कुलकर्णी फुलंब्री यांनी दिले. पतसंस्थेतर्फे अॅड. संदीप केशरलाल ढाकरे व अॅड. सचिन केशरलाल ढाकरे यांनी काम पाहिले.

 नानासाहेब मनगटे यांनी चिंचोली लिंबाजी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेकडून २० लाख रुपये कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न करता कर्ज परतफेडीसाठी दिलेला २२ लाख ७९ हजार १३९ रुपयांचा धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेने अॅड. संदीप केशरलाल ढाकरे व सचिन केशरलाल ढाकरे यांच्यामार्फत नानासाहेब मनगटे यांना नोटीस पाठविली. परंतु, आरोपीने नोटीस स्वीकारूनसुद्धा पतसंस्थेस धनादेश रक्कम न दिल्याने फुलंब्री यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले. पतसंस्थेस शासनाचे निर्बंध लागल्यामुळे प्रशासक समिती गठित करण्यात आली प्रशासक समितीचे अध्यक्ष म्हणून एस. पी. काकडे, सदस्य म्हणून व्ही. एस. रोडगे व विनय धोटे यांनी आरोपीविरुद्ध प्रकरण चालविण्याचा पहिला ठराव जो होता तो कायम करून त्यानुसार प्रकरण कोर्टात चालविण्यात आले.

न्यायालयाने पतसंस्थेचे वसुली अधिकारी शिवाजी विठ्ठलराव कदम यांची साक्ष नोंदविली. त्यांना संस्थेचे मुकेश गायके यांनी मदत केली. न्यायालयाने या प्रकरणात साक्षीपुरावा नोंदवून व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणात गुणवत्तेवर पतसंस्थेच्या हक्कात निकाल दिला. आरोपी नानासाहेब पुंडलिक मनगटे यांना १ वर्षाची शिक्षा सुनावली व आरोपीस पतसंस्थेकडे २५ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. पैसे न भरल्यास तीन महिने अधिक साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. पतसंस्थेतर्फे अॅड. संदीप ढाकरे व अॅड. सचिन ढाकरे यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. प्रिया अहिरे, अॅड. पूजा फुके, सतीश सुरडकर, प्रमोद पांडे, स्नेहाली गवळी यांनी सहकार्य केले. कर्जदाराने कर्ज भरावे, नसता कारवाई करण्यात येईल, असे विशेष लेखा परीक्षक एस.पी. काकडे यांनी कळविले आहे.